Saturday, March 11, 2023

Jyotirbhaskar Jayant Salgaokar Sir - Ek Anubhav

नमस्कार - आपल्या सगळ्यांच्या रोजच्या दैनंदिन कार्यात एका कॅलेंडर चा खूप मोठा सहभाग असतो. आमच्या घरात कॅलेंडर आणी पंचांग ह्या दोन्ही गोष्टी आम्ही लहानपणापासून पाहात आलोय. आम्ही पौरोहित्य करणारे ब्राह्मण नसलो तरी मला चांगले आठवते १९७०-८० च्या दशकात व त्यापूर्वी घरोघरी पंचांग उपलब्ध असायचे. आम्ही मूळचे रत्नागिरीचे भंडारी समाजातले. क्षित्रय गटात मोडणारे आम्ही भंडारी, आमचे पूर्वज छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा आरमार सांभाळायचे, व महाराजांनी आम्हाला मायनाक हि पदवी बहाल केली होते व आज ते आमचे आडनाव आहे, ह्याचं विस्तारित कथारूप वेगळ्या पोस्टमध्ये करिन.  बरं विषयाला न वळवता मुद्द्यांकडे येतो.  

आमचे आजोबा श्री बाळकृष्ण रावजी मायनाक ह्यांना पंचांगाची बऱ्यापैकी समाज होती. पंचांग कश्याप्रकारे वाचावे, हे त्यांना माहित होते. पण सर्वसामान्यांसाठी ह्या पंचांगाला कॅलेंडर बरोबर जोडण्याचे काम ज्योतिर्भास्कर श्री जयंत साळगांवकर सर ह्यांनी केले हे आपल्या सर्वाना माहीतच आहे. कालनिर्णय घराघरात, विविध भाषेत व विविध सदरात आपल्याला दिसून येते. एक मराठी मुलगा म्हणून मला कालनिर्णय चा आकंठ आभिमान वाटतो. वाटलाच पाहिजे. हे फक्त कॅलेंडर नसून भरपूर माहितीचे भांडार आहे. व कालनिर्णय बद्धल लिहायला सुद्धा एक वेगळीच पोस्ट बनवावी लागेल. मला आज तुम्हा सर्वाना सांगायची आहे ती श्री जयंत सांगावकर सरांच्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलेले कुलदैवताबद्धल त्यांचे विचार. जे अर्थात मला पटले व मी त्या विचारांचे आचरण सुद्धा केले. 

मला आठवत नाही नक्की कुठल्या वर्षाची मुलखत होती. पण हो आजपासून नक्कीच २० वर्षांपूर्वीची असावी. दूरदर्शन वर ज्योतिर्भास्कर श्री जयंत साळगांवकर ह्यांची एक मुलाखत सुरु होती, मी ती मधूनच पाहण्यास सुरुवात केली. 
त्या मुलाखती मध्ये त्यांनी देवपूजा व देव देवतांसंधारबीत काही गोष्टी सांगितल्या, त्यापैकी माझ्या लक्षात राहिलेली व माझ्यावर सकारात्मक बदल झालेली हि गोष्ट. 

ज्योतिर्भास्कर श्री जयंत साळगांवकर सांगत होते, तुम्ही सर्व देवांची पूजा करता, कोणी गणपतीची पूजा करतं कोणी साईबाबांची पूजा करतं. हे उत्तम आहेच पण त्याचबरोबर आपण आपल्या कुलदेवतेची पूजा करतो का? हे हि तितकेच म्हत्वाचे आहे. 

ते म्हणाले, आपण आपल्या कुलदेवतेची पूजा केलीच पाहिजे, आपल्या संकटकाळात सर्वप्रथम धावून येणारी शक्ती आपल्या कुलदेवतेचीच असते. आपल्या सर्वात निकटवर्तीय देव म्हणजेच आपले कुलदैवत. हि छोटीशी गोष्ट, आठवण म्हणा जी माझ्या डोक्यात जणू छापली आहे. मी बराच प्रयत्न केला हि मुलाखत शोधण्याचा पण मला नाही मिळू शकली. खरंच पुन्हा एकदा पाहायला आवडेल हि मुलाखत. असो, बहुतेक त्यांचे हे शब्द माझ्या नशिबी होते व त्यामधून बोध घेऊन त्याचे आचरण करण्याची बुद्दी मला झाली व त्यातनं मला चांगलाच अनुभव आला. आजोबांच्या देवपुजे मुळे आम्हाला आमच्या कुलदेवतेची माहिती होतीच पण पुढे जाऊन मी माझ्या आजोबांकडून कुलदेवतेबद्धल अधिक माहिती मिळवली. 

ज्योतिर्भास्कर श्री जयंत साळगांवकर सरांना आभार मानणे हेच ह्या लेखाचं मूळ उद्धिष्ट. त्यांना प्रत्यक्षात कधी भेटता नाही आलं. पण अजून दररोज सकाळी कालनिर्णय बघताना त्यांचे नाव वाचून खूप छान वाटते. मनातली हि गोष्ट कुठेतरी नोंद करून ठेवावी म्हणून हि पोस्ट लिहिली. पुन्हा एकदा ज्योतिर्भास्कर श्री जयंत साळगांवकर सरांचे मनापासून आभार. 

धन्यवाद सर.
नंदकुमार मायनाक (यतीन)

No comments: